
साहित्यः एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पालक, मेथी, कांद्याची पात यापैकी कोणतीही एक, बारीक चिरलेली पालेभाजी, एक बारीक चिरलेला कांदा, पाऊण लहान चमचा वाटलेले आले आणि लसूण, चवीनुसार वाटलेली हिरवी किंवा लाल मिरची,चवीनुसार मीठ,अर्धा छोटा चमचा ओवा,आवश्यकतेनुसार तेल.

कृती : प्रथम वरील सर्व साहित्य एकत्र करून छान मिसळून घ्यावे. त्यात थोडे तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ 1 तास भिजत ठेवावे. भिजलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करावेत. पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा ओले फडके घेऊन त्यावर गोळा हाताने थापावा. तव्यावर आवश्यकतेनुसार तेल घालावे. थापलेले थालिपीठ तव्यावर टाकून मंद आचेवर लाल होईपर्यंत खरपूस भाजावे. तयार झालेले थालिपीठ दही, लोणचे किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.