
भारतीय नौदलाच्या सहाव्या आणि अंतिम कावेरी श्रेणीतील ‘वाघशीर’ या पाणबुडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल, असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २० एप्रिल २०२२ रोजी मुंबईत ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’च्या कान्होजी आंग्रे तळावर या पाणबुडीचे उद्घाटन झाले होते.
भारतीय नौदलाच्या या कलवरी पाणबुडी श्रेणीतील पाणबुड्या आहेत. ‘वाघशीर’ ही पाणबुडी सर्व सागरी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २०२४ च्या सुरुवातीला भारतीय नौदलात सामील करण्यात येईल. माझगाव गोदीने ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत गेल्या २४ महिन्यात ३ पाणबुड्या नौदलाला सुपूर्द केल्या आहेत. ‘वाघशीर’ या सहाव्या पाणबुडीची सागरी चाचणी सुरु होणे हा भारतीय नौदलासाठी मैलाचा दगड ठरला आहे.

‘वाघशीर’ पाणबुडीच्या सागरी चाचणीत, शस्त्रास्त्र तसेच इतर प्रणालींची चाचणी घेण्यात येईल. ‘आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत बांधण्यात आलेल्या या पाणबुड्या नौदलात दाखल झाल्यानंतर नौदलाची कार्यक्षमता वाढणार आहे. भारतीय सागरी क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.