भ्रमणध्वनी क्रमांकाद्वारे मिळणार शासकीय लाभ
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारने संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर ‘मिस्डकॉल’ देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून मदतीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.

या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाउनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह टपालाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

मुख्यमंत्री सहायता निधीचे सर्वाधिक येणारे अर्ज हे कर्करोगासाठी आहेत. त्यापाठोपाठ हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनी विकार या आजारांसाठी अर्ज येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली जाते. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या शंका दूर करून त्यांना मदत देण्यासाठी सरकारने हा नवा उपक्रम जाहीर केला आहे.