
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील ४०८३ घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २२ ला दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती म्हाडा मुंबई मंडळाने दिली. विविध उत्पन्न गटांसाठी ही सोडत निघत आहे.
विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांबाबत विस्तृत माहिती म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in तसेच https://www.mhada.gov.in यांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे . इच्छुक अर्जदारांनी याच संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. पात्र अर्जांची संगणकीय सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे.

म्हाडाने संगणकीय आज्ञावली अधिकाधिक पारदर्शक, सोपी, सुलभ आणि सुरक्षित केली आहे. सोडत प्रक्रियेमधे सहभागी होण्याकरिता सर्व प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाविरहित १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी २६ जून, २०२३ रोजी 6 वाजेपर्यंतचा वेळ आहे. बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरणा २८ जूनपर्यंत करता येईल. प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाइन दावे आणि हरकती ०७ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदविता येणार आहेत. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येईल. एकूण ४०८३ सदनिकांसाठी ही सोडत निघत आहे.