Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

जर्मनीचे चान्सलर दक्षिण कोरियात दाखल

जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या ‘जी-7’ शिखर परिषदेनंतर जर्मनीच्या चान्सलरचे रविवारी दक्षिण कोरियाच्या राजधानीत आगमन झाले. द्विपक्षीय चर्चेसाठी जर्मनीच्या चान्सलरने दक्षिण कोरियाला भेट देण्याची ३० वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यावेळी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ट्झ यांनी उत्तर कोरियाने यापुढे अण्वस्त्र क्षेपणास्त्राच्या चाचण्या न करण्याचे आवाहन केले आहे.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांनी जर्मन चान्सलरच्या सोल भेटीदरम्यान लष्करी गुप्त कराराची घोषणा केली. ते म्हणाले, ”हा करार गुप्तचर लष्करी माहितीचे संरक्षण करेल. संरक्षण उद्योगाची पुरवठा साखळी सुरळीतपणे चालविण्यास मदत करेल.”

दरम्यान, जर्मन चान्सलर म्हणाले, ”उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक आणि क्षेपणास्त्र चाचण्या अद्याप कोरियन द्वीपकल्पात उपस्थित आहेत, ही धोकादायक परिस्थितीची चिन्हे आहेत.” त्यांनी प्योंगयांगला आवाहन केले, की या चाचण्या प्रदेशाची स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी धोका आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हाने, हवामान बदल आणि युक्रेनवरील रशियाचे आक्रमण या विषयांवर जर्मन चान्सलर आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यांच्यात चर्चा झाली. जर्मनीची अर्थव्यवस्था चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. बर्लिनला हे अवलंबित्व कमी करायचे आहे. त्यासाठी आशिया खंडातील इतर देशांशी संबंध वाढवावे लागतील. चीन, जपान आणि भारतानंतर दक्षिण कोरिया ही आशियातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे.

जर्मनीतील चिप उत्पादनात दक्षिण कोरिया गुंतवणूक करेल, अशी आशा जर्मन चान्सलर यांनी व्यक्त केली. उच्च तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध नवीन उंचीवर नेण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीपूर्वी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून हेही हिरोशिमामध्ये होते. ‘जी-7’ परिषदेदरम्यान त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. सोलमध्ये जर्मन चान्सलरचे स्वागत केल्यानंतर यून म्हणाले, “आजपासून दक्षिण कोरिया आणि जर्मनी परस्पर आणि दूरदृष्टीचे सहकार्य वाढवतील, अशी आशा मला आहे. युरोप आणि आशियामध्ये शांतता आणि समृद्धीसाठी बंधुभाव मजबूत करतील.”

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *