वालाची लागवड
वालाची लागवड ताटी पद्धतीने करावी लागते. वेल अंदाजे ५ मीटरपर्यंत वाढते. वेलीला आधार दिल्यास आणि वर्षभर वेलींची छाटणी करत राहिल्यास उत्पादन चांगले मिळते. वालाची लागवड केल्यापासून वेल ताटीवर चढेपर्यंत अंदाजे २ महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे मधल्या काळात पालेभाज्यांचे मिश्रपीक घेण्याचा विचार शेतकरी करू शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पीक वर्षभर कुठल्याही हंगामात घेता येते.

ओलावा धरून ठेवणारी जमीन वालाच्या लागवडीसाठी योग्य असते. पाण्याचा निचरा न होणारी, पाणी साचून राहणारी जमीन या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम करते. जमिनीची नांगरणी करताना शेणखत पसरून ते जमिनीत मिसळावे. अंदाजे 1 हेक्टर वाल लागवडीसाठी 5 किलो बियाणे लागते.
गुजरातमध्ये सुरती पापडी, वाल पापडी अशा स्थानिक जातींची लागवड होते. कृषी विद्यापीठांनी वालाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. वेलीसारख्या वाढणाऱ्या जातींमध्ये फुले गौरी, डी. एल 453, दसरा वाल, दीपाली वाल; तर झुडुपवजा वाढणाऱ्या जातींमध्ये कोकण भूषण, अर्का जय, अर्का विजय, फुले सुरुची ही वाणे चांगले उत्पादन देतात.

ताटी उभारणीमुळे वेलीला आधार मिळून तिची वाढ चांगली होते. त्यामुळे उत्पन्न आणि उत्पादनही वाढते. ताटीमुळे हवा आणि सूर्यप्रकाश फळांच्या वाढीवर पोषक परिणाम करतो. खुरपणी, कीटकनाशक फवारणी आणि फळांची तोडणी ही कामे अत्यंत सुलभ होतात.