उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा म्हणजे सुट्टीमध्ये बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणीच! नवी मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई शहर – उपनगर इथून अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला हमखास भेट देतात. पिरवाडी समुद्रकिनारा गाठण्यासाठी उरणपर्यंत सार्वजिनक बस वाहतुकीची सोय आहे. त्याचप्रमाणे रस्तेमार्गे किंवा रेल्वेनेही आपण उरणपर्यंत जाऊ शकतो.

पिरवाडी समुद्रकिनारा १३०० मीटरचा आहे. हा किनारा खडकाळ आहे. नारळ पोफळीच्या बागा, सुपारीच्या बागा आहेत. उरणमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरीही आहेत. उरण हे समुद्राने वेढलेले असून पूर्वेला द्रोणागिरी डोंगर, दक्षिणेला रेवस बंदर, पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्र, तर उत्तरेला मुंबई पसरलेली आहे.

पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना मनःशांती लाभते. त्यामुळे त्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांचा ओढा या समुद्रकिनारी वाढता आहे. टेकडीवरून दिसणारी बंदरे, होड्या या किनाऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवतात. सकाळी आणि संध्याकाळी मच्छीमारबांधव ताजे मासे घेऊन या किनाऱ्यावर येतात.

त्याचप्रमाणे पूर्व परवानगी असल्यास उरणमध्ये ओएनजीसी कंपनीचे केंद्र तुम्ही पाहू शकतात. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पालाही भेट देऊ शकतात. उरणच्या जवळच मोरा बंदराजवळ भारतीय नौदलाचा तळही आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *