
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड बुधवारी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान प्रचंड आज हैद्राबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सीमा वादावरही चर्चा होऊ शकते. आज पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान प्रचंड भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या पहिल्या ‘रुपेडिहा लँड पोर्ट’चे उद्घाटन करतील.
भारतीय ‘रुपेडिहा लँड पोर्ट’वर सल्लागार म्हणून नियुक्त केलेले एपी सिंह यांनी बुधवारी सांगितले की, “पंतप्रधान सकाळी 11.30 वाजता नवी दिल्ली येथून या बंदराचे उद्घाटन करतील. ‘रुपेडिहा लँड पोर्ट’ सुमारे 200 कोटी रुपये खर्चून 115 एकर जमिनीवर बांधण्यात आले आहे.”

दरम्यान, यानंतर नेपाळचे पंतप्रधान प्रचंड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत. नवी दिल्लीतील नेपाळ-भारत बिझनेस समिटलाही ते संबोधित करतील. प्रचंड भारतात उपस्थित असलेल्या नेपाळी समुदायाच्या लोकांनाही भेटणार आहेत.