सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निषेधाचे फलक
माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर बुधवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याबद्दल फलक लावले होते. मात्र, नंतर पोलिसांनी हे फलक तिथून काढले आहे. युवक काँग्रेसच्या सदस्या रंजिता विजय गोरे यांनी हे फलक लावले होते. फलकावर भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकर यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. क्रीडाविश्वातील तुम्ही ‘देव’ आहात, असेही या फलकावर म्हटले होते.

साक्षी मलिक वगळता माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे सर्व कुस्तीपटू हरियाणातील त्यांच्या घरी परतले आहेत. कुस्तीपटूंनी असा दावा केला की, त्यांनी ‘मौन व्रत’ केल्यामुळे हरिद्वारमध्ये माध्यमांशी संवाद साधला नाही.

कुस्तीपटूंनी 23 एप्रिल रोजी जंतरमंतर येथे त्यांचे आंदोलन पुन्हा सुरू केले होते परंतु 28 मे रोजी नवीन संसद भवनाकडे जाताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून त्यांचे सामान हटवले आणि त्यांना परत येण्यापासून रोखले.