
शाळांना उन्हाळी सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना रोज काहीतरी वेगवेगळा सुका खाऊ येता – जाता तोंडात टाकायला हवा असतो. मग अशावेळी नेहमी काय बनवून ठेवणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. अशावेळी आपण झटपट १५ ते २० मिनिटांत भडंग चिवडा घरच्याघरी बनवू शकतो.
साहित्य
4 मोठ्या वाट्या भडंग चुरमुरे (बाजारात भडंग कुरमुरे विकत मिळतात)
फोडणीसाठी 3 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट
कढीपत्त्यची 15 पानं
3 चमचे मेतकूट
2 चमचे लाल तिखट
अर्धी वाटी शेंगदाणे
अर्धी वाटी आमचूर पावडर
चवीपुरते मीठ
चवीपुरती पिठीसाखर

कृती:
१) भडंग कुरमुरे पातेल्यात घ्यावेत. तेल न घालता मध्यम आचेवर परतून घ्यावे. कुरमुरे सारखे ढवळत राहावे. परतून कुरकुरीत झालेले कुरमुरे परातीत काढून ठेवावे.
२) त्याच पातेल्यात मंद आचेवर तेल गरम करावे. त्या तेलात शेंगदाणे तळून घ्यावे. थोडे लालसर झालेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेल्या कुरमुऱ्यावर घालावेत.
३) कुरमुरे आणि शेंगदाणे मिक्स करावेत. त्यातच मेतकूट आणि लाल तिखटाचे मिश्रण घालून हलक्या हाताने ढवळून एकत्र करावे.
४) उरलेल्या तेलात फोडणी करावी. त्यात हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालावा. कुरमुरे फोडणीत घालावेत. झाऱ्याने मिक्स करावे. आमचूर पावडर, मीठ आणि साखर घालावे. एकजीव करावे. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे ठेवावे. भडंग चिवडा गार झाला की लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावा.
भडंग चिवड्याचा रंग लालसर असतो. त्यामुळे लालसर रंग आणण्यासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर वापरावी. ज्यांना चिवड्यामध्ये लसूण आवडतो त्यांनी फोडणीच्या वेळी फोडणीतच लसूण तळावा.