
‘कलिंगडा’ला उन्हाळ्यातील एसी म्हणतात. कारण कलिंगड उन्हाळ्यात शरीराला फक्त वरूनच नाही, तर आतूनही थंडावा देते. उन्हाळ्यात होणाऱ्या घामोळ्यांवर किंवा मूत्रविकारांवर कलिंगड हा जालीम इलाज आहे. कलिंगडामध्ये जवळजवळ ९२ टक्के पाणी असते. ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो आणि शरीर आतून थंड राहायलाही मदत होते.
कलिंगडामध्ये पोटॅशियम, जीवसत्त्व ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असते. त्यात मुबलक प्रमाणात पाणी असते. आपल्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि स्त्रियांना येणाऱ्या हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी कलिंगड मदत करते. वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी कलिंगडाचा उपयोग होतो. दुपारच्या उन्हात शरीराला थंडावा मिळण्यासाठी कलिंगड खातात.

कलिंगडात असणारे ‘बी६’ जीवनसत्त्व हे लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे रोगांशी लढण्यासाठी प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज् तयार करते. ‘क’ जीवनसत्त्व केसांना मजबूत करण्यास फायदेशीर आहे, तर ‘अ’ जीवनसत्त्वामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. कलिंगडमध्ये तंतूमय पदार्थ असतात. जे पचनाला मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते. कलिंगडाचा एक मध्यम आकाराचा तुकडा रोज खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून वाचू शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कलिंगड खाल्ल्यावर पाणी कधीच पिऊ नये. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी कलिंगड खाणे टाळावे. रात्री कलिंगड खाल्यास अपचन, पोट खराब होणे, वजन वाढणे यांचा सामाना करावा लागू शकतो. मद्यपान करणाऱ्यांसाठी कलिंगड खाणे वर्ज्य आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तींनीही कलिंगड अल्प प्रमाणात खावे.