गणेशोत्सव जवळ येऊ लागला आहे, तसतशी मूर्तीकारांची लगबगदेखील वाढली आहे. अलीकडच्या काही वर्षात नवीन पिढीचा कल पर्यावरणपूरकतेकडे वाढताना दिसत आहे. नवी मुंबईतील कोपरखैराणे येथील मोरया कला व क्रीडानिकेतन मंडळ यावर्षी बाप्पाची पर्यावरणपूरक अनोखी मूर्ती साकारत आहे. यावर्षी बाप्पाच्या मूर्तीमध्ये अष्टविनायकाचे दर्शन होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ऋषीकेश पालवे यांनी सांगितले.
हे मंडळ फुलांचा बाप्पा साकारत आहे. यामध्ये अष्टविनायक आणि दगडूशेठ गणपतीला वाहिलेल्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. या संस्थानातून गणरायाला अर्पण केलेल्या फुलांपासून बाप्पाची सूबक मूर्ती घडविण्यात आली आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा महत्त्वाचा संदेश भक्तापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले. हे मंडळ दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देते. प्रख्यात मूर्तीकार राजन झाड व त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र विधीष झाड यांनी ही मूर्ती घडविली आहे.
बाप्पाची मूर्ती १२ फुटी उंच आहे. दरवर्षी ३५ किलोमीटर पायी प्रवास करुन ट्रॉलीवरुन ही मूर्ती आणली जाते. यापूर्वी मंडळाचे टीशर्ट देतानासुद्धा १ टीशर्ट-१ झाड अशी संकल्पना या मंडळाने राबविलेली आहे. दरवर्षी भक्तांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन या मंडळामार्फत केले जाते. गणरायाची आरती, भजन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमही उत्साहाने केले जातात. यावर्षी शक्य होतील, तितकी झाडे लावण्याचा या मंडळाचा मनोदय आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी तसेच अलीकडे मुर्तींसाठी माती मिळणेही अवघड होत असल्याने असे पर्याय उपकारक ठरणारे आहेत