जी-20 संमेलनाहून मायदेशी परतताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अडचणीत आले आहेत. सभागृहाचे अध्यक्ष मॅकार्थी यांनी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ते म्हणाले, की बायडेन कुटुंबाविरुद्ध त्यांच्या व्यावसायिक व्यवहाराबद्दल महाभियोग चौकशी सुरू करण्यासाठी ते सभागृहाच्या समितीला निर्देश देत आहेत.
सन २००९ ते २०१७ या काळात जो बायडेन अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांना परदेशी व्यवसायात फायदा करून दिल्याचा आरोप आहे. रिपब्लिकन पक्षाने यावर्षी अनेक महिने यासंदर्भात चौकशी केली होती, परंतु बायडेन यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. मॅकार्थी म्हणाले, “हे सत्तेचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यासाठी सभागृहाला पुढील चौकशीची आवश्यकता आहे. म्हणून आज मी आमच्या सभागृह समितीला अध्यक्ष बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशी सुरू करण्याचे निर्देश देत आहे.
यापूर्वी ट्रम्प यांच्यावरही हाऊसने दोनदा महाभियोग चालविला होता; परंतु सिनेटने त्यांना निर्दोष मुक्त केले. नंतर न्यायालयात त्यांना अधिक गंभीर आरोपांना सामोरे जावे लागले. सन २०२० च्या निवडणुकीत बायडेन यांचा विजय उलथवण्याचा प्रयत्न करण्यासह या वर्षात ट्रम्प यांच्यावर चार वेळा आरोप करण्यात आले आहेत.