विदर्भ साहित्य संघ

महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रास अर्पण केलेल्या अनेक संस्था आहेत. त्यातील ‘विदर्भ साहित्य संघ’ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे १४ जानेवारी, १९२३ रोजी या संस्थेची स्थापना केली. सध्या या संस्थेचे कार्यालय नागपूरमध्ये आहे. मार्च १९५० मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला स्थलांतरित करण्यात आले. ही संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करते. या संस्थेचे ‘युगवाणी’ हे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंदिया शाखेमध्ये ‘भवभूती रंगमंदिर’ नावाचे नाट्यगृह आहे. खामगाव शाखेत ‘कोल्हटकर स्मारक मंदिर’ उभारण्यात आले आहे.

मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास हे या संस्थेच्या कार्याचे ध्येय आहे. या मुख्य संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. सन १९४६ पासून विदर्भ साहित्य संघ हा ‘मराठी साहित्य परीक्षा’ घेत आहे. सध्या विदर्भ साहित्य संघाच्या सर्व महत्त्वाच्या शहरांत मिळून संघाच्या ५९ शाखा आहेत. दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन साजरा होतो. यादिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. या संस्थेमार्फत ना.पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष पुरस्कार, पु. ल. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कवितालेखन पुरस्कार, समीक्षा वाङ्मयासाठी देण्यात येणारा कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्कार, बा.रा.मोडक स्मृती बालसाहित्य लेखन पुरस्कार, अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मचरित्र लेखन पुरस्कार, नवोदित साहित्यलेखन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती विशेष पुरस्कार प्रदान केले जातात.

इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा’ या परीक्षा घेतल्या जातात. इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या समकक्ष ‘साहित्य विनीत’ ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षा दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी घेतल्या जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘साहित्य स्तानक’ ही पदवी परीक्षा, ‘साहित्य पारंगत’ ही पदव्युत्तर परीक्षा, ‘साहित्याचार्य’ ही आचार्य समकक्ष परीक्षा, ‘साहित्य वाचस्पती’ ही अत्युच्च परीक्षा होते. विशेष म्हणजे, या स्पर्धांना विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. ही संस्था साहित्य क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहे. परीक्षा, पुरस्कार तसेच विविध साहित्यिक उपक्रमांच्या व कार्यक्रमांच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या शाखासुद्धा त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध साहित्यिक उपक्रम राबवून मराठी साहित्याचा प्रचार-प्रसार करीत आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *