दादा कोंडके यांचे विनोदाने ठासून भरलेले मराठी चित्रपट सध्या छोट्या पडद्यावर दाखविले जात आहेत. त्यामुळे रसिकांचे घरबसल्या खळखळून मनोरंजन होत आहे. त्यांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा रविवारी ५ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना ‘झी टॉकीज’वर पहायला मिळणार आहे. दादांचे संवाद नेहमीच लोकप्रिय झाले आहेत. संवाद आणि अभिनय यामुळे रसिकांचे मनोरंजन होत असते; परंतु या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकही संवाद न बोलता प्रेक्षकांना हसवणाऱ्या दादांचे विनोद पाहता येणार आहेत.
दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी या चित्रपटात आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमाचे शीर्षक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या सिनेमातील नायकाचे नाव ‘मुक्या’ आहे. त्याला बोलता येत नसल्याने सारे गाव त्याला ‘मुका मुका’ अशीच हाक मारत असते. तर, दादांच्या रूपातील हा मुका नायक प्रेक्षकांना हसवून बेजार करतो. ते कसे, हे पाहण्यासाठी रविवारी चित्रपट पहावा लागेल. मनोरंजन आणि जनजागृती करणारा हा चित्रपट म्हणजे दादा कोंडके यांच्या दिग्दर्शन व अभिनयाचे दर्शन घडविणारा आहे. कथा पटकथा, गीतलेखन, अभिनय हे सर्व दादांनीच केले आहे.