दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई आपली ‘ह्युंडाई क्रेटा फेसलिफ्ट’ लवकरच नवीन बदलांसह, नव्या वैशिष्ट्यांसह भारतीय बाजारपेठेत दाखल करणार आहे. या वाहनात अनेक महत्त्वपूर्ण बदल दिसणार आहेत. अनेक नवीन फीचर्ससह ही गाडी बाजारात येणार असल्याचे कंपनीच्या टीझरवरून लक्षात येत आहे. कंपनीने या गाडीसाठी आरक्षण घेणे सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठेत ती 16 जानेवारीला येणार आहे. कंपनी या वाहनाच्या 7 प्रकारांसाठी आरक्षण स्वीकारत आहे. त्यात ई, ईएक्स, एस, एस ओ, एसएक्स, एसएक्स (टेक) हे प्रकार आहेत.
ही गाडी 6 मोनो टोन आणि एक ड्युअल टोन अशा बाह्य रंग पर्यायांसह पाहता येणार आहे. या गाडीसाठी आरक्षण रक्कम 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन ती आरक्षित करु शकतात. कंपनीच्या डीलरशीपवर त्याचे आरक्षणदेखील सुरू झाले आहे. ही आगामी गाडी तीन इंजिन पर्याय आणि 4 वेगवेगळ्या ट्रान्समिशनसह सादर केली जाईल. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत वाहनाचे आतील भाग खूपच प्रीमियम असावेत. यात पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक फ्रंट ग्रिल असावी, असे दिसते. एलईडी हेडलॅम्पचा लूकसुद्धा खूपच शार्प झाला आहे, जो उभ्या स्थितीत आहे.