चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्दयविकाराचा झटका आला होता, हे सर्वांनाच ज्ञात आहे. सध्या श्रेयस विश्रांती घेत आहे. त्याने आपल्या चाहत्यांना शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, ” आपले शरीर नेहमी आपल्याला संकेत देत असते, कृपया आपल्या शरीराचे ऐका. त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आपल्या डॉक्टरांशी अधिकाधिक चांगले संवाद साधा. डॉक्टर काहीतरी चाचण्या करायला सांगतील, असा विचार करून काही लोक अनेकदा डॉक्टरांच्या भेटी टाळतात. परंतु त्या चाचण्या किती उपयुक्त ठरू शकतात हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष करु नका. वेळ वाया घालवू नका. ”
हृदयविकाराच्या झटक्यातून वाचणे हा आपल्यासाठी चमत्कारच आहे, असे श्रेयस सांगतो. श्रेयसने देव, डॉक्टर, त्याचे हितचिंतक आणि विशेषत: त्याची पत्नी दिप्ती यांचे आभार मानले. आपण आयुष्याला किती गृहीत धरतो, याची जाणीव या घटनेने करुन दिली. आता श्रेयसला डॉक्टरांनी सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याच्या निर्मात्यांनीही त्याला आराम करण्यास सांगितले आहे. श्रेयसला कुटुंबासोबत रहायचे आहे. मुलीसोबत वेळ घालवायचा आहे. काही चित्रपट बघायचे असून पुस्तकेही वाचायची आहेत. श्रेयसने आपल्या पत्नी दिप्तीचे विशेष आभार मानले आहेत.