देवेंद्र पेम लिखित व दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ ही एकांकिका विशेष गाजली होती. नाट्यरसिकांनी या नाटकाला उत्तम प्रतिसाद दिला. या एकांकिकेचे रुपांतर सन १९९३ मध्ये नाटकात करण्यात आले. ३१ डिसेंबर १९९३ ला हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
या नाटकात मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा आहे. प्रत्येक महिन्याला या नाटकाचे साठ ते सत्तर प्रयोग होत. ‘ऑल द बेस्ट’ नाटक आजपर्यत १२ भाषांमध्ये प्रदर्शित झाले आहे. या नाटकाचे जवळजवळ १०००० प्रयोग झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. आता नव्या नाटकात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री हे कलाकार दिसणार आहेत. सध्या या नाटकाचा जोरदार रियाज सुरू आहे. ‘ऑल द बेस्ट’ हे एक धमाल नाटक आहे. अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, भरत जाधव, श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर या कलाकारांनी या नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.