महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत जहांगीर कलादालन येथे झाले. या प्रदर्शनात राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या युवा कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून हे प्रदर्शन दिनांक १९ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते जाहिरात व डिझाईन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अरुण पद्मनाभ काळे यांना ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धातुकला क्षेत्रातील कलाकार विवेकानंद दास यांना ६३ वा महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देण्यात आला.
राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, दृश्य कला व वास्तुकला नगरांना तसेच महानगरांना दृश्य ओळख करून देतात. अशा प्रकारच्या नव्या दृश्य कलाकृतीमुळे देशाचा इतिहास, समृद्ध वारसा व जीवनमूल्ये जगापुढे येतील. कला व वास्तुकलेत समृद्ध असलेल्या भारतातील कलाकारांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात मुंबईला एक नवी दृश्य ओळख देणारी कलाकृती निर्माण करावी. आपण स्वतः काष्ठ कलाकार असून वेळ मिळेल त्यावेळी काष्ठशिल्पे व देवतांच्या मूर्ती तयार केल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले. गावागावातील छुप्या कलाकारांना पुढे आणले गेले पाहिजे असे, राज्यपालांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील कलाकार पूजा पळसंबकर, अनिकेत गुजरे, मुकेश पुरो, प्रसाद गवळी, अभिषेक तिखे, नूरील भोसले, सुनील विणेकर, प्रसाद मेस्त्री, नागनाथ घोडके, सचिन पखाले, श्रवण भोसले, साक्षी चक्रदेव, योगेश आबुज, प्रसाद निकुंभ व सोहेब कुरेशी या कलाकारांना प्रत्येकी ५०,००० रु. पारितोषिक रक्कम असलेले ६३ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा तसेच अनेक कलाकार उपस्थित होते.