अमेरिकेतही शिवरायांचा नामघोष दुमदुममला

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतासह जगभरात साजरी केली जाते. महाराजांच्या नावाचा जयघोष विदेशातही दुमदुमतो. अमेरिकेतील टेक्सास राज्यात डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाकडून यावर्षीही शिवजयंती दणक्यात साजरी करण्यात आली. डॅलस-फोर्टवर्थ येथील ११००हून अधिक कुटुंबे या मंडळाची सभासद आहेत. या कार्यक्रमासाठी मुलापासून प्रौढ स्त्री-पुरुष सर्वच उत्साहाने सहभागी झाले होते. सन २०१५ पासून येथे हा शिवजयंती उत्सव होत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अनुप शहापूरकर यांनी सांगितले.
सुजित साठे यांच्या संकल्पनेतील कार्यक्रमाचे यावर्षी आयोजन केले होते.त्यांनी शिव चरित्रातील घटना साकारल्या. तब्बल १४० हून अधिक कलाकारांनी सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. ढोल-ताशांच्या गजरात महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिरही आयोजित केले होते. मंडळाचे खजिनदार युधिष्ठिर जोशी, सचिव शामली असनारे, सहखजिनदार श्रीरंग गोल्हार यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.