पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पाकिस्तानमध्ये नवीन युती सरकारच्या स्थापनेसाठी अनेक दिवसांच्या चर्चेनंतर मंगळवारी 20 फेब्रुवारी 2024 रोजी एक करार झाला आहे. पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी मंगळवारी उशिरा संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले की, “पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शेहबाज शरीफ पुन्हा पंतप्रधानपदाची भूमिका स्वीकारतील, तर पीपीपीचे सह-अध्यक्ष आसिफ झरदारी देशाचे पुढील राष्ट्रपती असतील.”
निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी नॅशनल असेंब्लीच्या ९३ जागा जिंकल्या आहेत. यातील बहुतांश अपक्षांना पीटीआयचा पाठिंबा आहे. पीएमएल-एनने 75 जागा जिंकल्या, तर पीपीपी 54 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) ने देखील त्यांना 17 जागांसह पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे.