
तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती होण्यासाठी अर्ज केला आहे. इम्रान खान यांचे सल्लागार सय्यद जुल्फिकार बुखारी यांनी समाजमाध्यमांवरुन ही माहिती दिली.
बुखारी म्हणाले की, दि. 28 ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. ऑक्सफर्डच्या 800 वर्षांच्या इतिहासात प्रथमच या पदासाठी ऑनलाइन मतदान होणार आहे. इमरान खान कुलपती झाले तर ते आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती असतील. ही केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे तर संपूर्ण आशिया आणि उर्वरित जगासाठी मोठी उपलब्धी असेल.
इम्रान खान हे स्वतः ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1972 मध्ये केबल कॉलेज, ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्राची पदवी मिळविली. याशिवाय त्यांनी 2005 ते 2014 या काळात ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीचे कुलपती म्हणूनही काम केले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.