स्वादिष्ट मिष्टान्न ‘लाडू’

गोल गरगरीत, रवाळ, पिठूळ, विविधरंगी लाडू हा महाराष्ट्रात तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटक पदार्थांपासून बनविले जाऊ शकते. बेसन, रवा, तसेच वेगवेगळ्या डाळींचे पीठ वापरून बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनविले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चवीसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ट पदार्थ लहान मुलांना पौष्टिकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.

घटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनविले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. मुगाच्या वाटल्या डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू यांचा समावेश यामध्ये होतो. याखेरीज मोतीचुराचे लाडू (अर्थात बारीक बुंदीचे) हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनविल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, अळीवाचे लाडू, मेथीचे लाडू इत्यादी प्रकारांची गणना होते. याशिवाय रव्याचे लाडू, कुरमुऱ्याचे लाडू, पोळीचे लाडू, डिंकाचे लाडू, पोह्याचे लाडू, दाण्याचे लाडू , काजू व बदामाचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनविलेले लाडवांचे प्रकारही आहेत.