सावंतवाडीचा लाकडी खेळणी उद्योग
सिंधुदुर्ग हा तळकोकणातील शेवटचा जिल्हा आहे. येथील सावंतवाडी हे संस्थानकालीन शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात लाकडी वस्तू या खूप चांगल्या आणि कमी दरात मिळतात. मुख्यत्वे येथील स्थानिक कारागीरच या वस्तू बनवितात.
सावंतवाडी म्हणजेच ‘सुंदरवाडी’ होय. या शहरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. या शहरात राजवाडा, लाकडी फळे, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, भोसले उद्यान, आत्मेश्वर तळी व शिल्पग्राम आदी माध्यमातून येथे येणारे पर्यटक अधिक स्थिरावतात. ‘सावंतवाडी’ हे शहर संस्थान काळातील खेमसावंत-भोसल्यांची राजधानी होती. सावंतवाडीतील ‘चितार आळी’ हा भाग कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकानांनी गजबजलेला असतो.

सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तु व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळे, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविधरंगी माळा, शोभेच्या गृहवस्तू उत्कृष्टपणे तयार केल्या जातात.
गेल्या तीन शतकांहून अधिक काळ सावंतवाडी हे लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिध्द आहे. लाकडी फळे, गंजिफा व लाखेच्या वस्तू यांच्या निर्मितीचेही येथे परंपरागत केंद्र आहे.

सावंतवाडीतील लाकडाच्या वस्तू या केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे केवळ लाकडांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या खूप असते. वेगवेगळी कलाकुसर केलेल्या लाकडी वस्तू तसेच वेगवेगळ्या प्रकारची लहान मुलांची खेळणी इथे मिळतात. ही खेळणी तर लहान मुलांचे लक्ष अगदी पटकन आकर्षून घेतात. भातुकलीच्या खेळांपासून ते लाकडाची रेल्वे, बाहुल्या अशा प्रकारची विविध खेळणी इथे मिळतात. ही सावंतवाडीची लाकडी वस्तुंची बाजारपेठ खूप वर्षांपूर्वीची आहे. त्या काळातील राजे शिवरामराजे भोसले यांनी तिथल्या नागरिकांना आर्थिक मदत म्हणून लाकडी वस्तू बनविण्याचे छोटे छोटे कारखाने उभारून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. स्थानिक नागरिकांच्या रोजगारासाठी उभे केलेली बाजारपेठ आज जागतिक दर्जाची बाजारपेठ झाली आहे.
या बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी खुळखुळे, लाकडी गाड्या, लाकडाचे वेगवेगळ्या प्रकारचे भोवरे, लाकडाच्या बॅटस् अशी लाकडाची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, लाकडी बैलगाड्या, लाकडी शोभेची घरे तसेच शोभेची फळे, स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, मुलींसाठी लाकडी बांगड्या अशा साऱ्या लाकडापासून तयार केलेल्या वस्तू इथे मिळतात. इथे अतिशय सुंदर कुंड्याही मिळतात. विशेष म्हणजे या कुंड्या दुमडताही येतात.
पंधरा रुपयांपासून ते अगदी पंधरा हजार रुपयापर्यंतच्या लाकडी वस्तू या बाजारात मिळतात. त्यामुळे लाकडाच्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी एकदा तरी सावंतवाडीला जाऊन या बाजाराला नक्कीच भेट द्या.
या लाकडी वस्तूच्या उद्योगाने येथील कारागिरांना चांगला रोजगार दिला आहे.
सावंतवाडी शहरात राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत. जवळील विमानतळ चिपी- वेंगुर्ला, मोपा-गोवा आहे. कोकण रेल्वेने जाऊ शकता. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरावे. एसटी बसने गेल्यास सावंतवाडी बस डेपो पासून अगदी ५०० मीटरच्या अंतरावर आहे.