आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर असतील. या दरम्यान ते हिसार आणि यमुनानगरला भेट देतील. राज्यातील पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने अनेक प्रमुख विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करतील. पंतप्रधान हिसार ते अयोध्या थेट विमानसेवा सुरू करणार आहेत. ‘संकल्प की उडान’ कार्यक्रमांतर्गत ते हिसार ते अयोध्या या पहिल्या विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. हिसार ते अयोध्या ही विमानसेवा आठवड्यातून दोनदा चालवली जाईल, तर जम्मू, अहमदाबाद, जयपूर आणि चंदीगडसाठी आठवड्यातून तीन उड्डाणे असतील असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी हिसार विमानतळावरील नवीन टर्मिनलची पायाभरणी देखील करतील.
त्यांच्या हरियाणा दौऱ्याबद्दल ट्विट करताना त्यांनी लिहिले की, ‘आंबेडकर जयंती हरियाणाच्या विकास यात्रेला समर्पित असेल. सकाळी १०:१५ वाजता, मी हिसार-अयोध्या दरम्यानच्या व्यावसायिक उड्डाणाचे उद्घाटन करेन आणि विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करेन. दुपारी यमुना नगरमध्ये अनेक प्रकल्पांशी संबंधित कार्यक्रम आहे. दिवसभरात, मोदी यमुनानगरमधील दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाच्या ८०० मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज युनिटची पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून बांधलेल्या १४.४ किमी लांबीच्या रेवाडी बायपास प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील. या प्रकल्पावर सुमारे १,०७० कोटी रुपये खर्च झाले आहेत.