मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क-नागपूर कार्यान्वित

पीएम गतिशक्ती उपक्रमांतर्गत वर्ध्याजवळ सिंदी येथे उभारण्यात आलेले एमएमएलपी अर्थात मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क-नागपूर मंगळवारी कार्यान्वित झाले. दळणवळणाच्या विविध माध्यमांचा वापर करत वस्तू आणि सेवांची जलद वाहतूक करून दुर्गम भागांनाही विना-अडथळा जोडून घेण्याच्या उद्देशाने एमएमएलपी ची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या २५० चारचाकी गाड्यांचा पहिला संच पोहोचला असून त्यामुळे एमएमएलपीच्या वाणिज्यिक कारभाराचा प्रारंभ झाला आहे.
अशा रितीने व्यापक रेल्वेसुविधांनी युक्त असे मल्टिमोडल कार्गो टर्मिनल पूर्णतः कार्यान्वित होणे, हा अभिमानास्पद क्षण असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे. दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय वापरत विना-अडथळा कार्गो वाहतूक करणे यामुळे शक्य होणार आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे