गोमय वस्तू प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गो उत्पादन दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दोन दिवसीय गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात पंचगव्यांपासून बनविलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या प्रदर्शनास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यांगतांनी भरघोस प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील गो शाळांच्या प्रतिनिधींनी सुबक आणि उत्कृष्ट वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये पंचगव्यांपासून बनवण्यात आलेल्या वस्तू भीमसेन कापूर, बिना बांबू अगरबत्ती, धूप, सांबरणी धूप आदी पुजेच्या वस्तू होत्या.पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या औषधांचे फायदे यासंदर्भातील पुस्तकांचे दालन देखील प्रदर्शनात होते.
पंच्यगव्यापासून तयार केलेले तेल, फंगल इन्फेक्शन स्प्रे, पचनशक्ती / रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्क, जखमेसाठी मलम, डोळे आणि कानात टाकण्यासाठी श्रवण थेंब या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
याशिवाय सौंदर्यवर्धनासाठी सुगंधी उटणे, गोरस सोप, उटणे, दंतमंजन या वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून येत होता. याशिवाय गोवऱ्या, गांडूळ खत, शुद्ध तूप या वस्तू देखील होत्या.