महाराष्ट्र दिनानिमित्त खेड तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त खेड येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि प्रशासकीय प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
ध्वजारोहण समारंभानंतर मंत्री योगेश कदम यांनी खेड येथील स्थानिक पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी विशेषतः सायबर सेल आणि स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी कामकाज, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि तक्रारींचे निवारण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. वाढत्या सायबर गुन्ह्यांचा विचार करता, त्यांनी सायबर विभागाच्या कार्यक्षमतेवर विशेष भर दिला. त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसराची स्वच्छता आणि व्यवस्थापन याबद्दल समाधान व्यक्त केले आणि काही सुधारणांसाठी सूचना केल्या.