कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प, पवना धरण पर्यटन सादरीकरण व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे, यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे निविदेत दिलेल्या कालमर्यादेत करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.
या प्रकल्पातील कामांचेही सविस्तर प्रकल्प अहवाल जलदगतीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.