
फणसाची कुवरी 1 ( लहान फणस ज्यामध्ये अजून गरे तयार झाले नाहीत) , ठेचलेला लसूण 7 ते 8 पाकळ्या, 1 ते २ मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे, कढीपत्ता 5/6 पाने, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा मोहरी, मालवणी मसाला 1 ते दीड चमचा, (मिरच्या आवडत असल्यास वापरू शकता.) तेल 2 चमचे, मीठ आवडीनुसार, किसलेले ओले खोबरे 3 ते 4 चमचे.

कृती
प्रथम फणसाच्या कुवरीचे काटेरी साल व मधला चिवट भाग काढून घ्यावा. काहीजण हा मधला भाग काढत नाहीत. (त्याला फणसाची ‘माव’ असे म्हणतात) त्यानंतर फणसाचे तुकडे करून मीठ व थोडे पाणी टाकून कूकरला 3 शिट्ट्या काढून वाफवून घ्यावा. कूकर थंड झाल्यावर हे तुकडे गाळून घ्यावेत. खलबत्त्यात ठेचूनकिंवा किसणीवर किसून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण टाकावा. लसूण परतून घेतला की त्यात कांदा, मोहरी, कढीपत्ता टाकावा. मोहरी तडतडली की त्यात हळद आणि मालवणी मसाला टाकावा. थोडा वेळ परतून लगेच ठेचलेला फणस टाकून परतून घ्यावा. गरज असल्यास मीठ घालावे. 1 वाफ काढून घ्यावी. नंतर भाजी परतून किसलेले ओले खोबरे टाकावे व परतून घ्यावे. ( या भाजीस कांदा आणि तेल जास्त प्रमाणात लागते. आवडत असल्यास मटार, शिजविलेले वाटाणे, हरभरे या भाजीत टाकू शकता. काही ठिकाणी सुक्या लाल मिरच्यांची वरून फोडणी दिली जाते.)
आता फणसाच्या कुवरीची खमंग आणि चटपटीत भाजी खाण्यासाठी तयार आहे.छान भाजी होते. बघा तर प्रयत्न करून!!