कॅम्पा कोला पुन्हा येणार
‘रिलायन्स’ आपला व्यवसाय झपाट्याने वाढवीत आहे. आता कंपनीने ५० वर्षे जुने पेय नव्या शैलीत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रिलायन्स कंन्झ्युमर प्रोडक्टस लिमिटेड’ (आरसीपीएल) ने गुरुवारी ‘कॅम्पा कोला’ हे देशातील 50 वर्षे जुने प्रतिष्ठित पेय पुन्हा सादर करण्याची घोषणा केली.

‘आरसीपीएल’ ही मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. ही कंपनी दैनंदिन वापरातील वस्तूंचे व्यवहार करते. विशेष म्हणजे, यावर्षी जानेवारीमध्ये, आरसीपीएलने गुजरात स्थित कार्बोनेटेड शीतपेय आणि ज्यूस बनविणाऱ्या ‘सोशियो हझुरी बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये 50 टक्के हिस्सा विकत घेतला. यापूर्वी, त्यांनी प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून ‘कॅम्पा ब्रँड’ 22 कोटी रुपयांना विकत घेतला होता. आता ‘आरसीपीएल’ ने पुन्हा हा ब्रँड सादर केला आहे.

कंपनीकडून निवेदन जारी करुन सांगण्यात आले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात ‘कॅम्पा कोला’ , ‘कॅम्पा लेमन’ आणि ‘कॅम्पा ऑरेंज’ या तीन नवीन फ्लेवर्सचा शीतपेयांच्या श्रेणीमध्ये समावेश केला जाईल. ‘कॅम्पा-कोला’ हे 1970 आणि 1980 च्या दशकात एक लोकप्रिय शीतपेय होते. आधी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध होईल. नंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात सादर केले जाईल. ‘कॅम्पा-कोला’ हा ‘कोका-कोला’ आणि ‘पेप्सिको’ च्या आगमनानंतर मागे पडला.