पाळीव प्राण्यांचे वसती स्थान
आवड म्हणून पाळलेले पाळीव प्राणी आणि त्या प्राण्यांचे संगोपन करताना, त्यांची योग्य निगा राखताना अनेक वस्तू, साधनांचा केला जाणारा वापर व या माध्यमातून केली जाणारी आर्थिक कमाई याला एकत्रितपणे
‘पाळीव प्राण्यांचा उद्योग’ असे म्हटले जाते.

समजा, आपल्याकडे जागा उपलब्ध आहे किंवा घरातील व्यक्तींना प्राण्यांविषयीची आवड आहे, तर आपण आपल्या घरातील मोकळ्या जागेत पाळीव प्राण्यांचे वसतीस्थान सुरु करू शकता. अशा व्यवसायासाठीची मागणी ओळखीतून वाढविता येते. अशा प्रकारच्या व्यवसायासाठी थोडी मोकळी आणि हवेशीर जागा पाहिजे. शक्यतो घराच्या धाब्यावरील जागा किंवा अंगण सुद्धा चालेल. येथे जवळपास पाण्याची सुविधा करता आल्यास उत्तम. त्याचा उपयोग स्वच्छतेच्या कामासाठी आवश्यक आहे. पक्षी, कुत्रा, क्वचित प्रसंगी मांजर सांभाळणे अशा संधींसाठी या जागेचा वापर करता येईल.
या प्राण्यांचे पाणी आणि जेवण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरीकडे असले तरी घरचे वातावरण त्यांना मिळाले पाहिजे, यादृष्टीने विचार करावा. या घरात थोड्याफार प्रमाणात फर्निचर लागेल. आजूबाजूचा परिसर बंदिस्त असावा. येण्याजाण्याचे दार कायम बंद राहील याची दक्षता घ्यावी. धोकादायक वस्तू थोड्या लांब असाव्यात अशी व्यवस्था असावी. अंगण असल्यास ते खडबडीत स्वरुपात असावे. पाण्याचा आणि कचऱ्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. उजेड, वारा, ऊन आणि सोबत मोकळी फिरायला जागा मिळाल्यास उत्तम. जमीन ओलसर राहता नये, इत्यादी प्रकारची खबरदारी घ्यावी.

असा व्यवसाय घरच्या घरी करता येतो. त्यामुळे बांधकामाचा फारसा खर्च येत नाही. प्राण्यांची जेवणाची व्यवस्था, फिरायला घेऊन जायच्या वेळा सांभाळाव्यात. त्यांचे आरोग्य उत्तम राहील याची दक्षता घ्यावी. तसेच अनेक जाती एकत्र असल्याने त्यांच्यात भांडण होणार नाही, यादृष्टीने विविध खेळ आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. विविध जाती आणि त्यांचे स्वभाव, सवयी, दिनचर्या याची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. प्राण्यांना आणायची – सोडायची सोय केल्यास त्याचा जास्त फायदा होईल. हा व्यवसाय उत्तमच आहे.